Thursday, September 11, 2008

नवा चित्रपट - वेन्‌स्डे

"कॉमन मॅन'चा "अनकॉमन' उद्रेक... 
"मुंबई मेरी जान', "रॉक ऑन' आणि आता "वेन्‌स्डे'... फक्त एका आठवड्याच्या अंतरानं प्रदर्शित झालेल्या या तीन कलाकृती. तिन्हीचे विषय, त्यांचे सादरीकरण अगदी भिन्न, पण पाहणाऱ्याला अंतर्बाह्य हलवून टाकण्याची त्यांची किमया अगदी सारखी आहे. 
अवघ्या एकेक आठवड्याच्या अंतरानं एवढ्या उच्चतम दर्जाच्या कलाकृती प्रदर्शित होण्याची बॉलीवूडमधील बहुधा ही पहिलीच वेळ असावी. दीड-दोन तासांचा सिनेमासुद्धा कशा प्रकारची उंची गाठू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून "वेन्‌स्डे'चं नाव घ्यावं लागेल. सध्या बॉलीवूडमध्ये नव्या दमाचे दिग्दर्शक खूप तयारीनं आणि मनापासून स्वतःला व्यक्त करीत आहेत. या सिनेमाचे लेखक- दिग्दर्शक आहेत नीरज पांडे. सध्या प्रत्येक जण दहशतवादाच्या सावटाखाली जगत आहे. हे जगणंच जेव्हा अशक्‍य होतं, तेव्हा किती भयंकर घडू शकतं. "कॉमन मॅन'नं ठरवलं, तर अशक्‍य काही नाही... हे या सिनेमात पाहायला मिळतं. नसिरुद्दीन शाह या अभिनयसम्राटाचा आणखी एक थक्क करणारा अभिनय आणि त्यांना अनुपम खेर यांनी तेवढ्याच ताकदीनं दिलेली साथ हे या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 

हा सिनेमा घडतो अवघ्या चार तासांमध्ये. एका बुधवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेदरम्यान घडलेल्या काही थरारक घटनांची कहाणी म्हणजे "वेन्‌स्डे'. मुंबईचे पोलिस आयुक्त प्रकाश राठोड (अनुपम खेर) यांना एक निनावी फोन येतो. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार जहाल अतिरेक्‍यांची सुटका करण्याची त्याची मागणी असते. या मागणीची पूर्तता न झाल्यास ही व्यक्ती (नसिरुद्दीन शाह) मुंबईत विविध ठिकाणी पेरलेल्या बॉम्बचे स्फोट घडवून आणण्याची धमकी देते. सुरुवातीला राठोड या धमकीकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोलिस मुख्यालयासमोरच्या पोलिस ठाण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने त्यांना "ऍक्‍शन' घ्यावी लागते. येथून सुरू होतो तो जबरदस्त "ड्रामा' आणि त्याचा शेवट होतो ते एका अनपेक्षित "क्‍लायमॅक्‍स'वर. 

बॉम्बस्फोटासारखी घटना घडली की सर्वात तीव्र प्रतिक्रिया उमटते ती सर्वसामान्यांमध्ये, कारण समाजाचा हाच वर्ग अशा प्रकारच्या घटनांमध्ये सर्वाधिक भरडला जातो, मात्र या घटना रोखण्यासाठी "काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी!' या मुळमुळीत वाक्‍यापलीकडे या वर्गाची काही मजल जात नाही. लेखक-दिग्दर्शकानं नेमकं या पलीकडे जाण्याची कल्पकता लढवलीय आणि त्याला त्यात छान यश मिळालंय. सुरुवातीची पहिली पंधरा मिनिटं या सिनेमातले काही "ट्रॅक' आणि त्यातल्या व्यक्तिरेखा नुसत्याच भिरभिरत राहतात, पण त्यानंतर हा सिनेमा पाहणाऱ्यावर आपली "कमांड' घेतो. 

नसिरुद्दीन शाहनं साकारलेल्या व्यक्तिरेखेबद्दल दिग्दर्शकानं कमालीचं गूढ निर्माण केलंय. हे गूढ पाहणाऱ्याला सबंध चित्रपटभर गुंतवून ठेवतं. शाहनी दिलेल्या धमक्‍या आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी लावलेली "फिल्डिंग' चित्रपटाला वेगवान बनविते. पोलिस ठाण्यात बॉम्ब ठेवून तिथून थंड डोक्‍यानं ते बाहेर पडत असतानाचा प्रसंग छान जमलाय. या सर्व प्रकरणात "मीडिया'चा वापर करण्याची कल्पकता दाद देण्याजोगी आहे. कठीण समयी राजकीय व्यक्तींचे खरे चेहरे पाहायला मिळतात. हा अनुभव या सिनेमातून मिळतो. बॉम्बस्फोट घडू न देण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कामाला लावलेली तपासयंत्रणा, धर्मांधतेचं कार्ड वापरून अतिरेक्‍यांकडून होणारी पोलिसांची परीक्षा, वाहिन्यांकडून होणाऱ्या उथळपणाचा अतिरेकी कारवायांसाठी होणारा वापर... हा सर्व घटनाक्रम अगदी जमून आला आहे. नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांचा "क्‍लायमॅक्‍स'मधील वावर जबरदस्त आहे. या दोघांच्या अभिनयामुळेच हा सिनेमा विलक्षण उंचीवर गेलाय. शाह यांची या सिनेमातली देहबोली जबरदस्त आहे. संपूर्ण चित्रपटभर हा कलावंत जवळपास एकाच लोकेशनवर पाहायला मिळतो. दृश्‍यपातळीवरची ही मर्यादा या अभिनेत्यानं आपल्या देहबोलीनं दूर केलीय. ते आपल्या व्यक्तिरेखेत एवढे बुडून गेले आहेत, की पाहणाऱ्यालाही ते नसिरुद्दीन शाह आहेत याचा विसर पडतो. शाह यांच्या कारकिर्दीच्या काही सर्वोत्तम "रोल्स'पैकी हा एक "रोल' ठरावा. त्यांना तेवढीच साथ खेर यांनी दिली आहे. हा कलावंत एकाच साच्यातल्या भूमिका वर्षानुवर्षे करीत राहिल्यानं त्यांची अभिनयातली उंची फार कमी चित्रपटांमधून पाहायला मिळालीय, पण या चित्रपटात त्यांच्या चेहऱ्यावरचा थंड "लूक' पाहण्यासारखा आहे. चित्रपटाचे पार्श्‍वसंगीत आणि छायाचित्रण दाद देण्याजोगे. अशा जमून आलेल्या चित्रपटांना दाद देण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांची आहे. 

No comments: