Thursday, September 11, 2008

नवा चित्रपट - वेन्‌स्डे

"कॉमन मॅन'चा "अनकॉमन' उद्रेक... 
"मुंबई मेरी जान', "रॉक ऑन' आणि आता "वेन्‌स्डे'... फक्त एका आठवड्याच्या अंतरानं प्रदर्शित झालेल्या या तीन कलाकृती. तिन्हीचे विषय, त्यांचे सादरीकरण अगदी भिन्न, पण पाहणाऱ्याला अंतर्बाह्य हलवून टाकण्याची त्यांची किमया अगदी सारखी आहे. 
अवघ्या एकेक आठवड्याच्या अंतरानं एवढ्या उच्चतम दर्जाच्या कलाकृती प्रदर्शित होण्याची बॉलीवूडमधील बहुधा ही पहिलीच वेळ असावी. दीड-दोन तासांचा सिनेमासुद्धा कशा प्रकारची उंची गाठू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून "वेन्‌स्डे'चं नाव घ्यावं लागेल. सध्या बॉलीवूडमध्ये नव्या दमाचे दिग्दर्शक खूप तयारीनं आणि मनापासून स्वतःला व्यक्त करीत आहेत. या सिनेमाचे लेखक- दिग्दर्शक आहेत नीरज पांडे. सध्या प्रत्येक जण दहशतवादाच्या सावटाखाली जगत आहे. हे जगणंच जेव्हा अशक्‍य होतं, तेव्हा किती भयंकर घडू शकतं. "कॉमन मॅन'नं ठरवलं, तर अशक्‍य काही नाही... हे या सिनेमात पाहायला मिळतं. नसिरुद्दीन शाह या अभिनयसम्राटाचा आणखी एक थक्क करणारा अभिनय आणि त्यांना अनुपम खेर यांनी तेवढ्याच ताकदीनं दिलेली साथ हे या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 

हा सिनेमा घडतो अवघ्या चार तासांमध्ये. एका बुधवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेदरम्यान घडलेल्या काही थरारक घटनांची कहाणी म्हणजे "वेन्‌स्डे'. मुंबईचे पोलिस आयुक्त प्रकाश राठोड (अनुपम खेर) यांना एक निनावी फोन येतो. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार जहाल अतिरेक्‍यांची सुटका करण्याची त्याची मागणी असते. या मागणीची पूर्तता न झाल्यास ही व्यक्ती (नसिरुद्दीन शाह) मुंबईत विविध ठिकाणी पेरलेल्या बॉम्बचे स्फोट घडवून आणण्याची धमकी देते. सुरुवातीला राठोड या धमकीकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोलिस मुख्यालयासमोरच्या पोलिस ठाण्यात जिवंत बॉम्ब सापडल्याने त्यांना "ऍक्‍शन' घ्यावी लागते. येथून सुरू होतो तो जबरदस्त "ड्रामा' आणि त्याचा शेवट होतो ते एका अनपेक्षित "क्‍लायमॅक्‍स'वर. 

बॉम्बस्फोटासारखी घटना घडली की सर्वात तीव्र प्रतिक्रिया उमटते ती सर्वसामान्यांमध्ये, कारण समाजाचा हाच वर्ग अशा प्रकारच्या घटनांमध्ये सर्वाधिक भरडला जातो, मात्र या घटना रोखण्यासाठी "काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी!' या मुळमुळीत वाक्‍यापलीकडे या वर्गाची काही मजल जात नाही. लेखक-दिग्दर्शकानं नेमकं या पलीकडे जाण्याची कल्पकता लढवलीय आणि त्याला त्यात छान यश मिळालंय. सुरुवातीची पहिली पंधरा मिनिटं या सिनेमातले काही "ट्रॅक' आणि त्यातल्या व्यक्तिरेखा नुसत्याच भिरभिरत राहतात, पण त्यानंतर हा सिनेमा पाहणाऱ्यावर आपली "कमांड' घेतो. 

नसिरुद्दीन शाहनं साकारलेल्या व्यक्तिरेखेबद्दल दिग्दर्शकानं कमालीचं गूढ निर्माण केलंय. हे गूढ पाहणाऱ्याला सबंध चित्रपटभर गुंतवून ठेवतं. शाहनी दिलेल्या धमक्‍या आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी लावलेली "फिल्डिंग' चित्रपटाला वेगवान बनविते. पोलिस ठाण्यात बॉम्ब ठेवून तिथून थंड डोक्‍यानं ते बाहेर पडत असतानाचा प्रसंग छान जमलाय. या सर्व प्रकरणात "मीडिया'चा वापर करण्याची कल्पकता दाद देण्याजोगी आहे. कठीण समयी राजकीय व्यक्तींचे खरे चेहरे पाहायला मिळतात. हा अनुभव या सिनेमातून मिळतो. बॉम्बस्फोट घडू न देण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कामाला लावलेली तपासयंत्रणा, धर्मांधतेचं कार्ड वापरून अतिरेक्‍यांकडून होणारी पोलिसांची परीक्षा, वाहिन्यांकडून होणाऱ्या उथळपणाचा अतिरेकी कारवायांसाठी होणारा वापर... हा सर्व घटनाक्रम अगदी जमून आला आहे. नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांचा "क्‍लायमॅक्‍स'मधील वावर जबरदस्त आहे. या दोघांच्या अभिनयामुळेच हा सिनेमा विलक्षण उंचीवर गेलाय. शाह यांची या सिनेमातली देहबोली जबरदस्त आहे. संपूर्ण चित्रपटभर हा कलावंत जवळपास एकाच लोकेशनवर पाहायला मिळतो. दृश्‍यपातळीवरची ही मर्यादा या अभिनेत्यानं आपल्या देहबोलीनं दूर केलीय. ते आपल्या व्यक्तिरेखेत एवढे बुडून गेले आहेत, की पाहणाऱ्यालाही ते नसिरुद्दीन शाह आहेत याचा विसर पडतो. शाह यांच्या कारकिर्दीच्या काही सर्वोत्तम "रोल्स'पैकी हा एक "रोल' ठरावा. त्यांना तेवढीच साथ खेर यांनी दिली आहे. हा कलावंत एकाच साच्यातल्या भूमिका वर्षानुवर्षे करीत राहिल्यानं त्यांची अभिनयातली उंची फार कमी चित्रपटांमधून पाहायला मिळालीय, पण या चित्रपटात त्यांच्या चेहऱ्यावरचा थंड "लूक' पाहण्यासारखा आहे. चित्रपटाचे पार्श्‍वसंगीत आणि छायाचित्रण दाद देण्याजोगे. अशा जमून आलेल्या चित्रपटांना दाद देण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांची आहे. 

पुर्नजन्म


पत्नी ओरडत किचनकडे धावत जात म्हणाली, ""अहो गॅस बंद केला नाहीत का? केवढा वास येतोय!'' मी म्हणालो, ""अगं मला लायटर सापडलाच नाही; आता थांब. आता घाई करून कुठलंही इलेक्‍ट्रिकचं बटन दाबू नकोस...!'' मी अलगद खिडक्‍या उघडल्या आणि हातात येतील ते कपडे नॅपकिन, टॉवेल घेऊन दोघं तिघं किचनमध्ये हात फिरवून साठलेला गॅस खिडकीवाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो. .........
हरिश्‍चंद्र लचके हे खरे हरहुन्नरी कलावंत होते. ते केवळ व्यंगचित्रकार नव्हते; फोटोग्राफी, ब्लॉक मेकिंग, कलरिंग यांमध्ये त्यांचा हातखंड होता. शिवाय ते उत्तम तबलाही वाजवीत होते. या त्यांच्या छंदात आणखी एक छंद म्हणजे रविवारी जुन्या बाजारात फेरी मारणे. त्यांच्या स्टुडिओत अनेक कलात्मक दुर्मिळ वस्तू तेथूनच आणलेल्या असत. 

एकदा जिज्ञासा म्हणून मीही कधी न पाहिलेला जुना बाजार पाहायला त्यांच्याबरोबर गेलो. तिथला सारा मायाबाजार पाहून थक्क झालो. माझ्या कॅमेऱ्याची कातडी पिशवी उसवली होती. ती शिवण्यासाठी मी चांभाराला विचारले, तर त्याने वेगळ्या पद्धतीने शिवण्यास नकार दिला. मी लचकेंना विचारल्यावर त्यांनी कॅमेरा आणण्यास सांगितले. त्यांच्याकडे ब्लॉक मेकिंगसाठी लागणारी अनेक हत्यारं होती. त्यांनी पंधरा मिनिटांत ती पिशवी शिवून दिली. 

लचके यांच्या या सवयीमुळे मीही आता घरच्या बारीकसारीक गोष्टी बिघडल्या की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागलो. एकदा गॅस पेटविण्याचा लायटर बिघडला. लगेच मी तो रॉकेलने ठिणगी पडते तिथे साफ करताच, तो पूर्ववत काम करू लागला. 

घरी म्युझिक सिस्टिम होती; पण घरच्या लोकांच्या मालिका पाहण्याच्या तंत्रात मला गाणी ऐकण्यास वेळच मिळत नसे, म्हणून मी हेडफोन आणला. इतरांना त्रास न देता आरामात तो वापरू लागलो. काही दिवसांतच तो बिघडला. मी नेहमीप्रमाणं स्पीकर काढून पाहिले; पण तो सुरू झाला नाही. ""तुम्हाला माहीत नसताना कशाला हात लावलात? आता बोलवा मेकॅनिकला!'' मुलीनंही माझ्या अज्ञानाचा पंचनामा केला. मेकॅनिकने दोन दिवसांनी सारं ठीक करून दिलं. 

काही दिवस मी माझ्या अपयशामुळे घरातल्या कोणत्याच गोष्टीला पुन्हा हात लावायचा नाही, असं ठरवलं. महिनाभर "ऑलवेल' चाललं होतं. अचानक घरी पाहुणे आले होते. ऐन स्वयंपाकाच्या वेळी गॅस लायटर पुन्हा बिघडला. पत्नीनं खूप आग्रह केला म्हणून मी लायटरला हात लावला. पूर्वानुभवानुसार मी रॉकेलनं साफसफाई केली; पण यश आलं नाही. मग लायटरच्या मागील बाजूनं साफ करण्याचं ठरवून मी मागील बाजूचं झाकण काढून एकेक पार्ट रॉकेलच्या वाटीत काढून साफ केला. वाटीमध्ये अनेक प्रकारचे स्क्रू. वायसर, स्प्रिंग होत्या, ते पुन्हा लायटरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. पण तो क्रम आठवत नव्हता आणि पर्यायानं लायटर दुरुस्त होत नव्हता. घरी पाहुणे होते. आताची वेळ महत्त्वाची होती. मी चटकन बाहेर पडून एक जुजबी प्लॅस्टिकचा लायटर आणून पत्नीच्या हाती दिला. तिनं काय ओळखायचं ते ओळखलं! नशीब बलवत्तर! घरी पाहुणे होते म्हणून पत्नीनं तोंडाची तोफ डागली नाही! 

मी घाईनं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत लायटरचे सर्व पार्ट आणि त्याबरोबर बांधून ठेवले. चार-सहा दिवसांनी पाहुणे गेल्यावर लायटरची बांधून ठेवलेली पुरचुंडी घेऊन जवळच्याच इलेक्‍ट्रॉनिक दुकानात हार्डवेअरच्या दुकानात याच्या दुरुस्तीबद्दल विचारले, तर कोणीच या कामास होकार दिला नाही. 

पुण्यात तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी आणि जुना बाजार ही तीन ठिकाणं अशी आहेत, की तुमची कोणतीही महत्त्वाची कामं इथं मार्गी लागणारच! म्हणून मी प्रथम जुन्या बाजारात चक्कर मारली. तर एवढ्याशा कामासाठी तिथं कोणी बोलायलाच तयार नव्हतं. 

मग तुळशीबागेत गेलो, तर तिथले दुकानदार म्हणाले, ""हा व्याप कोण करणार नाही. नवीनच खरेदी करा!'' शेवटी रविवार पेठेत गेलो. तेथील एक दुकानदार म्हणाला, ""अहो तुम्ही आता कोणत्या युगात वावरताय? कुणी हातात घेणार नाही असलं काम! हा नदीत फेकून द्या आणि नवीन घ्या!'' शेजारीच कुलपाच्या किल्ल्या करणाऱ्याचं एक दुकान होतं त्यांच्याकडं अगदी अद्ययावत यंत्रसामग्री होती ती पाहून मी त्यांना माझं काम सांगितलं. त्यानं मात्र सहानुभूतीनं मला सांगितलं- ""इथला सगळा व्यवसाय वेगळा आहे. इथं तुम्ही मुळीच फिरू नका. मी तुम्हाला एक पत्ता सांगतो तिथं जा. बुधवार चौकात दगडू हलवाई मंदिरासमोर फुटपाथवर एक कारागीर पेटी घेऊन बसतो, तो ही सर्व कामं करतो!'' मी त्यांचे आभार मानले. मला देवदूतच भेटल्याचाच आनंद झाला! मी लगेच बुधवारातील मंदिरासमोर गेलो. तिथं फुटपाथवर कुणीच नव्हतं! तिथल्या दुकानदाराला विचारलं. तो म्हणाला, ""हे इथंच एक माणूस बसतो खरा; पण गेल्या आठवड्यात तो इथं दिसला नाही. बहुधा आजारी असावा!'' मी मनात म्हटलं, "ठीक आहे! पत्ता तर कळला. पाहू पुन्हा येऊ केव्हातरी!' असा विचार करून मी घरी परतलो. मी घरी आलो तरी डोक्‍यात एकच विचार होता. आता हा कामगार फुटपाथवर कामाला येणार केव्हा आणि आलाच तर मला कळणार कसं? पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही कशी? तो ज्या दुकानासमोर फुटपाथवर बसतो त्या दुकानदाराचा फोन नंबर मी कसा घेतला नाही! 

गेल्या उन्हाळ्यात असंच उन्हात हिंडल्यामुळं मला खूपच त्रास झाला होता. ते लक्षात आल्यावर आता घरी कुणी मला दुपारी बाहेर पाठविणं अशक्‍य होतं! 

एकदा अप्पा बळवंत चौकात पेनची कुठंही न मिळणारी चेलपार्कची टर्क्वाइज ब्लू शाई आणायची म्हणून बाहेर पडून रिक्षानं थेट बुधवारपेठ गाठली; पण तो फुटपाथ रिकामाच पाहून वाईट वाटलं! आठवणीनं तिथल्या दुकानदारांना भेटून दुकानाचा फोन नंबर घेतला आणि घरी परतलो. 

आता मी रोज गुपचूप सकाळ-संध्याकाळ दुकानात फोन करून चौकशी करीत होतो. दोन दिवसांत दुकानातून होकार येताच लायटरच्या पार्टसची पुरचुंडी हळूच खिशात टाकून रिक्षानं बुधवारपेठ गाठली. फुटपाथवर कारागीर बसलेला पाहून जीव भांड्यात पडला. कारागीर एका पेटाऱ्यासमोर काम करीत होता. त्याच्यासमोर दोन-तीन गिऱ्हाइकं उभी होती. त्या पेटाऱ्यावर टॉर्च, सिगारेट, लायटरचा ढीग पडला होता. दोन्ही गिऱ्हाइकांची कामं संपताच मी माझी पुरचुंडी त्याच्या हातात दिली. त्यानं ती समोर ओतून लक्षपूर्वक नजरेनं एकदा माझ्याकडे पाहिलं. मला वाटलं तो पुरचुंडी परत देतो की काय! पण तसं काही घडलं नाही. त्यानं पेटाऱ्यातून एकेक पार्ट काढून घासून ठेवला होता. पाच-दहा मिनिटांत त्यानं सर्व पार्ट भराभर लायटरमध्ये भरले आणि समोरचा सिगारेटचा लायटर हातात घेऊन उघडून तेथील वातीवर माझ्या लायटरची ठिणगी टाकताच ती वात पेटली. दोन-तीन वेळा अशी ज्योत पेटवून दाखवून त्यानं लायटर माझ्या हाती दिला. मीही दोन तीन वेळा ठिणगी उडवून पाहिली. माझ्या आजवरच्या श्रमांचं सार्थक झाल्याचा आनंद झाला. त्यानं सांगितलेल्या किमतीवर खूष होऊन मी अधिक बक्षिसी देऊन त्याची माहिती विचारली. तो सांगत होता. ""साहेब, खाली मान घालून काम करावं लागतं. मान फारच दुखू लागल्यानं दवाखान्यात तपासणी केली आणि आता औषधाबरोबर गळपट्टाही दिला आहे. रोज सकाळी मला निगडीहून यावं लागतं. इथलं वळण चांगलं बसलं आहे!'' 

मी बाहेर कुठं गेलो होतो हे कुणी विचारण्याआधीच मी खिशातून पत्नीचा आवडचा लायटर तिच्या हातात ठेवताच ती खूष झाली! 

आता लायटर भिजू नये आणि फोडणीचा फवारा उडणार नाही म्हणून मी प्लॅस्टिकच्या पिशवीत तो ठेवून ती पिशवी शेजारील ताटाळ्याच्या हूकला अडकवून ठेवली. अधून मधून तो नीट चालतो की नाही हे पाहण्यासाठी दुपारचा चहा मीच करू लागलो. ""काय मेलं त्या एवढ्याशा लायटरचं कौतुक!'' या पत्नीच्या टोमण्याबरोबर माझी मुलगी आणि नात यांचाही हा चर्चेचा विषय झाला होता. 

एकदा रविवारी संध्याकाळी टीव्हीवरचा चित्रपट सर्व जण पाहत बसलो होतो. जेवायला आत जायला कुणीच तयार नव्हतं. हातामध्ये डिश घेऊन बाहेर दिवाणखान्यातच सारे सिनेमा पाहत होतो. एका प्रसंगात मी कंटाळून उठलो आणि कॉफी करण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेलो. ओट्यावर सर्व जमवाजमव करून दुधाचं पातेलं गॅसच्या शेगडीवर ठेवून गॅसचं बटन ऑन केले. नेहमीच्या जागी लायटर पाह्यला लागलो, तर तिथं तो नव्हता. मी ""लायटर कुठं आहे?'' असं जोरानं विचारलं तोच बाहेरील दिवाणखान्यातून सर्वांचा मोठ्याने हसण्याचा आणि मला हाका मारण्याचा आवाज येताच मी धावत दिवाणखान्यात आलो. सर्व जण टीव्हीकडे पाहत जोरजोराने हसत होते. मीही त्यांच्या हसण्यात सामील झालो होतो. इतक्‍यात पत्नी ओरडत किचनकडे धावत जात म्हणाली, ""अहो गॅस बंद केला नाहीत का? केवढा वास येतोय!'' मी म्हणालो, ""अगं मला लायटर सापडलाच नाही; आता थांब. आता घाई करून कुठलंही इलक्‍ट्रिकचं बटन दाबू नकोस...!'' मी अलगद खिडक्‍या उघडल्या आणि हातात येतील ते कपडे नॅपकिन, टॉवेल घेऊन दोघं तिघं किचनमध्ये हात फिर फिरवून साठलेला गॅस खिडकीवाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो. दिवाणखान्यातील पंखाही सर्वांत मोठा करून ठेवला. या गोंधळात आमचे शेजारीही लगेच मदतीस आले. आम्ही खूप घाबरून गेलो होतो. थोड्या वेळानं शेजाऱ्यांनी किचनमध्ये येऊन कोपरान्‌ कोपरा आणि सिलिंडर तपासून आता काळजी करू नका असे सांगितले. 

मी शांतपणे विचार करीत होतो. त्या दुकानदारानं मला ""लायटर नदीत फेकून द्या असं म्हटलं होतं. मी तसं न करता त्या लायटरला कारागिराकडून "जीवनदान' दिलं होतं! आज किचनमध्ये गॅसचं बटन "ऑन' करून लायटरचा शोध घेताना आणि बाहेर येऊन सिनेमा पाहताना किचनमध्ये खूपच गॅस साठला होता. मला जर लायटर सापडला असता आणि तो मी पेटविला असता तर... सारंच संपलं असतं! पण मी धावच बाहेर गेलो आणि लायटरनंही कुठं तरी लपून मला "जीवदानच' दिलं होतं! तसा माझा पुनर्जन्मच झाला होता म्हणा ना! 

- डॉ. दत्ता वाळवेकर


marathi jokes


वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. "बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. " याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, "काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? " 
यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"


एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"
अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय."
आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल."


गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"

एक सौदागर घोड्यांच्या बाजारात विकण्यासाठी आपला एक थकलेला म्हातारा घोडा घेऊन आला. त्या घोड्याचा एकंदर `अवतार' पाहून एका माणसानं सौदागराला त्या घोड्याची किंमत विचारली. सौदागराने शंभर रुपये सांगताच तो गृहस्थ म्हणाला, "या मरतुकड्या घोड्याचे शंभर रुपये कोण देईल? तू हा गोडा मला पाच रुपयांना दे."
यावर सौदागर म्हणाला, "बरं, पाच रुपये. बोनीच्या वेळी होत असलेला हा सौदा, मी केवळ पंच्याण्णव रुपयांसाठी कशाला मोडू?"

Thursday, June 26, 2008